अभिप्राय, उद्‌गार, विचार, मते

 • ‘बुध्दिबळ आणि झब्बू‘ हे मराठीतले एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाटक आहे.

  -- विजय तेंडुलकर.

 • ‘ढोलताशे‘ न पाहणाऱ्याला मोक्ष मिळणार नाही.

  -- निळू फुले -- ‘ व्यक्त-अव्यक्त ‘ दिवाळी, २०००.

 • Then we have the genre of the ' discussion ' play, like those Adya Rangacharya used to write in Knnada -- take a thesis and discuss it threadbare. C. P. Deshpande's ' Budddhibal ani jhabbu ' is one such and it is theatrically valid without any gimmics.

  -- Amol Palekar, Times of India.

 • मराठी रंगभूमीवरच्या सदाबहार टॉप टेन नाटकांत ‘ बुध्दिबळ आणि झब्बू ‘ या नाटकाचा समावेश होतो.

  -- रत्नाकर मतकरी, लोकमत, ०६-०४- ०२.

 • चंप्रंची नाट्यलेखनाची एक विशिष्ट शैली आहे, ज्याला चर्चानाट्य वा विचारनाट्य म्हणता येईल, अशी. माणसाचं जगणं आणि त्या जगण्याच्या ओघात त्याला पडणारे प्रश्न यांचा सखोल व सर्वांगीण वेध चंप्र आपल्या नाटकांतून घेतात.

  -- रवींद्र पाथरे, लोकसत्ता.

 • चं. प्र. देशपांडे हे नाटकाच्या माध्यमातून काही गंभीर आशय, विषयाच्या वेगवेगळया बाजूंचा सखोल वेध घेऊन, मांडणारे नाटककार आहेत.

  -- बंडा जोशी, प्रभात, ०८-०६- ०३.

 • व्यावसायिक (आणि प्रायोगिकही!) नाटकांचा परंपरागत असा एक रूपबंध आहे. नाटकाचा विषय, त्याची मांडणी आणि लेखन यांविषयीचे काही संकेत इथे रूढ आहेत. या परंपरेला आणि त्यातून निर्माण झालेल्या संकेतांना दूर ठेवून नाट्यलेखन करणाऱ्या काही लेखकांत चंप्रंचा समावेश होतो.

  -- प्रसन्नकुमार अकलूजकर, लोकसत्ता, १२-०८- ०४.

 • ‘सध्या तरी शेवट गोड‘ या नाटकातले चं. प्र. देशपांडे यांचे संवाद हे नाटकाचे खास आकर्षण ठरावेत असे आहेत.

  -- मंगेश तेंडुलकर, सामना, १५-०२- ०५.

 • देशपांडे आपल्या नाट्यकॄतींमधली घटितं, व्यक्तिरेखा आपल्या विशिष्ट वर्गातील निवडतात, परंतु, अंतिमत: ते काही मूलभूत अनुभवांचा आविष्कार करतात.

  -- नीलकंठ कदम, आपलं महानागर, १७-०३- ९९.

 • देशपांडे मानवी जीवनातली, नातेसंबंधांतली ॲब्सर्डिटी - असंगतता टिपतात. त्यासाठी ते सर्वांच्या परिचयाची अशी वास्तववादी शैलीच स्वीकारतात पण या वास्तववादी मांडणीतून भावविवशतेला पूर्ण फाटा देतात, एवढंच नव्हे तर वाजवी भावनांच्या प्रदर्शनातली तीव्रताही अत्यंत कमी करून शब्दांवाटे व्यक्त होणाऱ्या विचारांना उठाव देतात आणि या दोन्हींना एका बारीक व्यंगात्मक धाग्यात बांधतात. म्हणजे एका अर्थाने ते वस्तववादी शैली स्वीकारतच तिच्यात मोडतोड करतात आणि अ-भावात्मक नाटकाची निर्मिती करतात.

  -- जयंत पवार, म. टा., ०१-०४- ९९.

 • C. P. Deshpande is Marathi's most innovative and notably modernist playwrights. ... ' Dholtashe ' is actually a miracle. Although it is full of " words, words, words ", it grips you from beginning to end.

  -- Dnyaneshwar Nadkarni, Times of India, 24-09- 99.

 • एखादी दु:खद घटना दाखवून प्रेक्षकांना हळहळायला लावणे किंवा नेमके आवडेल ते दाखवून त्यांना गदगदून हसायला लावणे या दोन्ही गोष्टी चं. प्र. देशपांडे यांना मान्य नाहीत. पण तरीही, कसलाही प्रचार किंवा प्रबोधन करणे हा त्यांच्या नाटकांचा हेतू असत नाही.

  -- डॉ. शरद भुथाडिया, कोल्हापूर सकाळ, १५-०१- ००.

 • आळेकर, राजीव नाईक यांच्याप्रमाणे देशपांडे कुठल्या एका नाट्यसंस्थेमध्ये नसल्यामुळे त्यांना प्रयोगशाळेसारखा रंगमंच वापरता आला नाही. ते अवलंबून राहिले ते निरनिराळया नाट्यसंस्थांवर. दुसरे म्हणजे, चंद्रकांत देशपांडे यांचे नाट्यलेखन अगदी प्रायोगिकवाल्यांनाही तसे जडच वाटले. माणसाच्या अस्तित्वाच्या अर्थाला, त्याच्या प्रयोजनालाच प्रश्न विचारणाऱ्या देशपांडे यांचे नाट्यलेखन जाणायचे व समजून घ्यायचे तर त्यासाठी प्रयत्न करायला लागतात. असंबध्दता, अतार्किकता, अनिश्चितता यांचा अनुभव वाचकाला येतो, तो असंबध्द, अतार्किक मांडणीमधून.

  -- माधव वझे, सा. सकाळ, २९-०७- ९५.

 • Mohile in ' Dhagedore ' can be hailed as the first anti-hero of Marathi theatre.

  -- M. K. Pardhy, Maharashtra Herald, Pune, 10-03- 97.

 • साहित्य म्हणून तसेच नाट्यात्मतेच्या गुणामुळे ‘ नातं ‘ हे नाटक महत्त्वाचे आहे.

  -- सुरेशचंद्र पाध्ये, सकाळ, ०३-०७- ९२.

 • ‘दाखवेगिरी‘ च्या दोषापासून आजचे कवी मुक्त नाहीत. चंद्रकांत देशपांडे व प्रभा गणोरकर यांच्याबद्दल आशा वाटते.

  -- पु. शि. रेगे.

 • चं. प्र. देशपांडे यांची नाटके बुध्दिवादी असतात, मेंदूला खाद्य पुरवणारी असतात, पण याचा अर्थ ती डोक्यावरून जाणारी असतात असा मात्र नव्हे. काही नाटकं मनाला आनंद देतात, तशी काही नाटकं बुध्दीलाही आनंद देतात. काही नाटकांतलं कारुण्य भावतं तर काही नाटकांतली तार्किकता किंवा तर्कपूर्ण धक्के झिणझिण्या आणतात. चंप्रंची नाटकं दुसऱ्या प्रकारची असतात.

  -- कमलाकर नाडकर्णी, आपलं महानगर, १५-११- ००.

 • चंद्रकांत देशपांडे यांनी गेल्या काही वर्षांत स्वत:ची अशी एक नाट्यशैली निर्माण केली आहे याची साक्ष ‘इतिहास‘ मध्ये मिळेल. केवळ लेखनतंत्राच्या आहारी न जाता ते आपला अनुभव गांभीर्याच्या पातळीवर नेमकेपणाने व्यक्त करतात. त्यांचा प्रातिभिक आवाका मोठे नाटक लिहिण्याचा आहे हे सहजपणाने जाणवते.

  -- डॉ. वि. भा. देशपांडे, निवडक एकांकिका, १९७७.

 • विषयाचा आणि आशयाचा वेगळेपणा ही चं. प्र. देशपांडे यांच्या नाटकाची खासियत.

  -- नीलिमा जांगडा, लोकमत, २१-०७- ०२.

 • माणसा-माणसातल्या नात्यांचा अर्थ काय ? ती कशामुळे निर्माण होतात ? ती टिकवण्याची धडपड फोलच असते का ? ही नाती माणसाच्या प्रत्यक्ष अस्तित्वापेक्षा मोठी असतात का ? चं. प्र. देश्पांडे लिखित ‘ नातं ‘ हे दीर्घांक-नाटक मानवी जीवनाला व्यापून उरणाऱ्या अशा प्रश्नांना सामोरे जाणारे आहे.

  -- मनीषा दीक्षित, लोकसत्ता, १८-०६- ९२.

 • The play ' Nanephek ' clearly points out a stark fact that life is quite miserly when it comes to providing answers.

  -- Huned Contractor, Times of India, 20-12- 01.

 • Deshpande is a dramatist of ideas. He takes you in a casual but logical way through little twists and turns of thought to his planned destination, revealing the human mind at work in a specific social situation along the way. What holds you is your complete inability to tell what the next twist will be.

  -- Shanta Gokhale, Times of India, 25-02- 01.

 • ‘प्रेमच म्हणू याला हवं तर...‘ हे एक बौध्दिक आनंद देणारे नाटक आहे.

  -- रवींद्र पाथरे, लोकसत्ता, ०१-०१- ०९.

 • वास्तववादी शैलीला मुरड घालत पण वास्तवाबद्दलच बोलत चंप्रशैलीतली नाटकं उभी राहतात, ती पात्रांच्या तपशिलात जात नाहीत. लक्षणांवर भर देतात. त्यामुळे अभिनयात वास्तववादी शैलीत काही प्रमाणात स्टायलायझेशन आणावं लागतं.

  -- जयंत पवार, म. टा. , २१-०२- ०९.